Rajatmahotsav HHS, 1942-1967

संपादकीय—

आमच्या सन्माननीय हितचिंतक-सुहृदांनो !

हडस विद्यालयाच्या रजत महोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशित होत असलेला हा स्मृतिग्रंथ आपल्या हाती सादर भावाने सोपविताना आम्हाला आनंद होत आहे. आपल्याच सहानुभूतीने व सदिच्छांनी आम्ही भूतकालाचा खडतर व खाचखळग्यांचा मार्ग आक्रमिला आणि वर्तमानच्या प्रांगणावर येऊन दाखल झालो. संस्थेच्या या जगन्नाथाच्या रथाला गतिमानता आपल्याच सहकार्याने लाभली आहे. भूतकालीन दोन तपांची वाटचाल ज्या सुहृदांच्या सहकार्याने आम्ही केली त्यांच्या अमाप ऋणातून मुक्त होण्याचा हा अल्पसा प्रयत्न आम्ही करीत आहोत. आपल्या लोभाची निर्मल गंगा अखंडपणे वाहत राहावी हीच प्रभुचरणी प्रार्थना.

आजचा आनंदोत्सव साजरा करीत असता गत दोन तपांचा भूतकालीन इतिहास आमच्या अन्तःकरणात जागृत होतो. त्यात पहिले स्मरण स्वर्गीय बापूसाहेब हडसांचे होते. त्यांनीच या संस्थेला जन्म दिला. केवळ संस्था काढून ते थांबले नाहीत तर संस्थेची पुत्राप्रमाणे जोपासनाही त्यांनी केली. स्वर्गीय बापूसाहेबांच्या विशुद्ध चारित्र्याला, निर्मल सेवाभावाला, ज्ञानदानाच्या अखंड साधनेला, अंगीकृत कार्य पूर्णतेला नेईलच या आंतरिक जिद्दीला, भविष्याचे अचूक वेध घेणाऱ्या दिव्य दृष्टीला आणि शाळेकरिता सर्वस्व समर्पणच नव्हे तर आत्मबलिदान करणाऱ्या धीरोदात्त मनोवृत्तीला आमचे सहस्रशः प्रणाम !

या प्रसंगी दुसरे स्मरण कै. दादासाहेब शेवडे यांचे होते. बापूसाहेब हडसांची अध्यापनचातुरी अन् प्रखर ध्येयवाद बघूनच संस्थेला सक्रिय सहानुभूती त्यांनीच दाखविली. ‘गुणी गुणं वेत्ति’ (गुणी जनांची परीक्षा गुणी जनच करतात.) या न्यायाने हडस-विद्यालयाला हाती धरून, त्यांनी त्याचा सर्व भार अंगावर घेऊन वाढविले. दादासाहेब मात्र त्या पुत्राचा दिव्य प्रताप बघण्याला आमच्यात नाहीत याचा खेद होतो. ‘यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवति तादृशी’ या उक्तीप्रमाणे आजचे हडस विद्यालयाचे विलोभनीय प्रगत स्वरूप येण्याला स्वर्गीय दादासाहेबांच्याच सदिच्छा कारणीभूत झाल्या हे मान्य करणे उचित ठरेल. स्वर्गीय दादासाहेब यांच्या पावन स्मृतीला शतशः प्रणाम.

स्वर्गीय दादासाहेब शेवडे यांच्या स्वर्गवासानंतर पोरक्या झालेला संस्थेला माननीय न्यायमूर्ती बापूसाहेब अभ्यंकर यांनी उदार मनाने व सहानुभूतीने आश्रय देऊन संगोपिले. महाराष्ट्रातील आदर्श शिक्षणसंस्थांत हडस विद्यालयाचा अन्तर्भाव व्हावा हीच जीवनाची इतिकर्तव्यता मानून अहोरात्र तिचा विकास घडविणाऱ्या योजना बापूसाहेब अभ्यंकरांनी कार्यान्वित केल्यात. या विद्यालयालाच आपले अपत्य मानून त्याच्या पालनाचा व सर्वांगीण विकासाचा भार आनंदाने व कर्तव्यनिष्ठेने आजही ते पार पाडीत आहेत, हे सर्वांना सुपरिचित आहेच. बापूसाहेबांची कार्यनिष्ठा, साधेपणा व अविरत सेवाभाव बघून कृतज्ञतेने अन्तःकरणात गहिवर येतो व शब्द अपुरे पडतात.

‘ नारायणे घातला पाया । पुरुषोत्तम झालासे कळस ।। ‘ स्वर्गीय हडसांच्या अमूर्त मनोरथाला साकार व पूर्णस्वरूप आणण्याचे कार्य श्री. आप्पासाहेब जोशी यांनी केले. हडसांच्या मृत्यूनंतर कालसागरातील तुफान लाटेवर गोते खाणाऱ्या कुजक्या नावेला सुखरूप काठावर नेऊन पोचविण्याचे विलोभनीय कार्य याच कर्जबाराने पार पाडले आहे. हडस विद्यालयाच्या दैदिप्यमान व नयनरम्य यशाचे खरे शिल्पकार आप्पासाहेबच होत. त्यांच्याच सुयोग्य मार्गदर्शनाने विद्यालयाला उत्तरोत्तर प्रगत रूप येत आहे. स्मृतिग्रंथाच्या संपादकाने केलेल्या गौरवापेक्षा भारतसरकारने राष्ट्रीय पारितोषिक देऊन केलेला गौरवच त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करणारा ठरतो. श्री. आप्पासाहेब जोशी यांच्या कार्यिचे प्रात्यक्षिक चित्ररूपाने व लेखनरूपाने आपणापुढे सादर करीत आहोत. हडस विद्यालय व आप्पासाहेब जोशी-यांच्या परस्पर सापेक्षतेचा प्रत्यय त्यांच्या मागाहून वाटचाल करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रेरक होईल ही अपेक्षा.

जान्हवीजलाप्रमाणे आसमंतीय प्रदेशाला पावन अन् समृद्ध करीत हा ज्ञानसरितेचा प्रवाह उत्तरोत्तर वर्धिष्णू व मनोवेधक रूपधारण करीत आहे. या ज्ञानसरितेला अनेक ज्ञात-अज्ञात प्रवाहांनी समृद्ध व वैभवशाली बनविले आहे. अनेक हितचिंतकांनी तनमनधनपूर्वक अकृत्रिम प्रेमाने शाळेला वेळोवेळी मदत करून कायमचे ऋणी करून ठेवले आहे. त्या सर्व ज्ञात-अज्ञात-अनामिकांचं — अनन्त स्वरूपात वावरणाऱ्या जनताजनार्दनाचे स्मरण आम्हाला निरंतन राहीलच. शाळेच्या प्रार्थनेत दररोज ‘अनंता तुझे’ ही प्रार्थना करून आम्ही जनताजनार्दनाचे आशीर्वाद प्रार्थीत असतो. विष्णुसहस्रनामाप्रमाणे तो जनताजनार्दन अनंत आमच्यावर भविष्यातही मंगलांचा अविरत वर्षाव करो हीच सदिच्छा.

आमच्या यशाचा मापदंड विद्यार्थी होत. त्यांच्याच यशाने आम्ही यशस्वी ठरलोत्. विद्यार्थ्यांची अढळ निष्ठा व अचल श्रद्धा असल्यामुळेच हडस विद्यालय अल्पावधीत हे मनोवेधक यश प्राप्त करू शकले. आमच्यावर असलेल्या या विद्यार्थ्यांच्या असीम प्रेमाचे वर्णन करण्याला शब्द अपुरे पडतात.

व. ग. पाठक

संपादक

रजतमहोत्सव स्मृतिग्रंथ


Posted

in

by

Tags:

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *